Tuesday 7 May 2019

गोल्डन अवर

कोणत्याही व्यक्तिच्या बाबत वैद्यकिय आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्या प्रसंगा नंतर येणारे काही तास खुप महत्वाचे असतात. त्या तासात मिळणारे उपचार त्या व्यक्तिचे जिवन किंवा मरण ठरविणारे असतात. त्यामुळे या तासांना वैद्यकिय भाषेत गोल्डन अवर असे म्हणतात. हृदय विकार, अर्धांगवायुचे रुग्ण यांच्यासाठी गोल्डन अवरचे विशेष महत्व आहे.गोल्डन अवर हि संकल्पना नेहमी फ़क्त शारिरीक स्वास्थ्यासाठी वापरली जाते. पण, मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कित्तेक गोल्डन अवर्स आपल्या हातून निसटुन जातात आणि मग आपल्याला मनाचे विकार जडतात आणि विचारांना अर्धांगवायुचा झटका येतो.

तसं पहायला गेलं तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा दिवस अगदी आखिव रेखिव असतो. सकाळी उठणे, घर आवरुन ऑफ़िस गाठणे, ऑफ़िस मधे काम करणे, घरी येणे आणि झोपणे. तुम्ही गृहिणी असाल तर सकाळी घरच काम आवरणे, मुलांना शाळेत पाठवणे, त्यांचा अभ्यास घेणे, थोडा आराम करणे, परत काम करणे यात पुर्ण दिवस जातो. आता या सगळ्या रेखिव आयुष्यात गोल्डन अवर्स शोधायला वेळ मिळतोच कुठे? खरं पहाता काय शोधायचे आहे हेच माहित नसताना शोधायचं काय आणि कसं हाच मोठा प्रश्न असतो. कारण, प्रत्येकासाठी असलेला गोल्डन अवर हा निरनिराळा असतो.

शाळा सुटल्यावर घरी येऊन कधी एकदा आईला शाळेतल्या गमतीजमती सांगतो असं झालेल्या पिटुकल्यासाठी शाळेतुन आल्यावरची 15 मिनिट्स गोल्डन अवर असतात. तेव्हा आईने प्रेमाने जवळ घेऊन केलेली विचारपुस त्या पिटुकल्यासाठी खुप मोठ्ठ टॉनिक असतं. कॉलेज मधे त्याच्याकडे आपण चोरुन पाहणे आणि त्याने त्याचवेळी आपल्याला पाहुन एक छान स्माईल देणे हा सोनेरी क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येतोच. संसाराच्या रोजच्या चक्रातुन बदल म्हणुन आपल्या "अहो किंवा अरे" नी प्लान केलेली सरप्राईज डेट गोल्डन अवर असते. दुरदेशी रहाणारी नातवंडे घरी आल्यावर त्यांचे हट्ट पुरविताना खर्च केलेले कित्तेक तास आजी आजोबांसाठी गोल्डन अवर्स असतात. आयुष्याच्या उतरणीला जुन्या आठवणी काढत, आपल्या जोडीदारा सोबत हसत झोपाळ्यावर झुलणं हा पण एक वेगळाच अनुभव असणार ना!

प्रत्येक नात्यात असे सोनेरी तास असतात ते शोधणं आणि जपणं खुप महत्वाचं असतं. जगातली कुठल्याच भौतीक सुखाची तुलना या गोल्डन अवर्स मधे असलेल्या सुखाशी करणे शक्य नाही. असं म्हणतात कि आजपर्यत विज्ञानाला मनाचा शोध लागलेला नाही. पण, मन कुठे आहे? असा प्रश्न आला कि हात फ़क्त हृदयाकडे जातो. तेव्हा त्याची काळजी घ्यायची असेल तर नात्यातले गोल्डन अवर्स शोधा. डॉक्टर होणे प्रत्येकाला जमतेच असे नाही पण आपल्या नात्यातल्या लोकांना गोल्डन अवर्स देऊन त्याचे आंणि आपले मन निरोगी करायला प्रत्येकाला नक्कीच जमणे शक्य आहे.

No comments: