Wednesday 15 May 2019

रिप्लेसमेंट



सेवानिवृत्तीचा प्रसंग प्रत्येक नोकरी करणा-या व्यक्तिच्या आयुष्यात नक्कीच येतो. त्यातही भारतीय शिक्षण पद्धतीच्या कृपेने अनेकांच्या जन्मदिनांकाची नोंद 1 जुन अशीच केलेली असते. त्यामुळे सरकारी आस्थापनांमध्ये मे महिनाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्ती होते. या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात संबंधीत कर्मचा-याचे सह कर्मचारी, निवृत्त होणा-या व्यक्तिच्या जुन्या आठवणींना आपल्या भाषणां मधुन उजाळा देतात, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या व्यक्तिमत्वाबाबत चार चांगल्या गोष्टी बोलतात. कार्यालयीन कामात असलेल्या निष्णातपणा (हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त असतो! ) कौतुक करतात आणि त्यांची जागा कशी कोणीच घेऊ शकत नाही हे जवळचे सहकारी अगदी डोळ्यात पाणी आणुन सांगतात. या सगळ्या समारंभात तसा नेहमीच वैयक्तिक स्तरावर जवळीक टाळणा-या उपस्थित अधिकारी वर्गाने मात्र सेवानिवृत्त होणा-या व्यक्तिची रिप्लेसमेंट शोधलेली असते.

आता रिप्लेसमेंटची वेळ आणि कारण हे फ़क्त सेवानिवृत्ती हे असतं असं नाही. सेवानिवृत्तीच्या रिप्लेसमेंटमधे निवृत्त होणा-या माणसाच्या कामासाठी फ़क्त नवा माणुस निवडला जातो. पण, आपण करत असलेली नोकरी आपल्याला एक व्यक्ती म्हणुन अर्तंगत मानसिक पातळीवर किती रिल्पेस करते हे आपण कधीच पहात नाही किंवा ते काळाच्या ओघात आपल्याला जाणवत नाही.

लहानपणी घरात कोणतेही नविन उपकरण आणले कि मी कधीच त्याच्या सोबत येणार म्यनुअल वाचायचे नाही. ते उपकरण सरळ वापरायचे. मग ते वापरायची पद्धत त्याचे फ़िचर्स हळूहळू आपोआप कळायचे. पण कार्यालयीन कामामुळे लागलेला सवयीचा भाग म्हणुन आता हातात आलेला कुठलाही कागद वाचल्याशिवाय सुटत नाही. आता एखादे नविन उपकरण आणले कि, ते उपकरण रहाते बाजुला आणि सर्वात आधी त्याच्या म्यनुअलचे वाचन सुरु होते. पुर्वी माझे वडिल म्यनुअल वाचायचे तेव्हा ते काम निरुपयोगी आणि कंटाळवाणे क वाटायचे. एकदा आईने मला घरातली रद्दी आवरण्याचे काम दिले आणि ती तिथुन निघुन गेली. बराच वेळ झाला मी ते काम शांतपणे करत होते. इतक्या छोट्या कामासाठी मी इतका वेळ का घेते आहे हे पहायला आई आली. मी आपल्याच तंद्रीत काम करत होते. तीने मला विचारले " काय करते आहेस? इतका वेळ का लागतो आहे?" मी तीला शांतपणे उत्तर दिले " रद्दी पेपर डेटवाइज आणि पेजवाइज लावते आहे." या नंतर घरात कितीतरी दिवस हा प्रसंग हसण्याचे कारण बनला होता. इथे कुठेतरी माझ्या नोकरीने माझ्यातल्या बेदरकार आणि बेशिस्त व्यक्तिला रिप्लेस करुन जबाबदार आणि शिस्तप्रिय केले होते.

माझ्या नोकरीच्या सुरवातीला कोणताही कर्मचारी लेखा शाखेत वैयक्तिक अडचणींची यादी घेऊन विनंती करायला आला कि माझे वरिष्ठ अधिकारी त्याचे सगळे बोलणे ऐकुन घ्यायचे. पण निर्णय मात्र नियमानुसार घ्यायचे. तेव्हा लोकांच्या वैयक्तिक अडचणी ऐकुन मला कमालीचे वाईट वाटायचे. असं वाटायचे हे साहेब इतके कशाला नियम पहात बसले आहेत. मदत करायला हवी. पण प्रशासन भावनांच्या आहारी जाऊन चालत नसते. ते नियमानुसार चालते. हे कळायला लागल्यावर माझ्यातल्या भावनांच्या आवेगाला नियमांच्या चाकोरीने रिप्लेस केलेच.

आपल्या करिअरच्या सुरवातीला आपल्या आधी संस्थेत असलेल्या लोकांचे जे वागणे आपल्याला चुक वाटते, ते आपण कसे वेग़ळे आहोत हे सांगत आपण ते आत्मसात करत असतो. यात सकारात्मक बदल असतात तसेच नकारात्मक बदलही असतात. एका कालावधी नंतर आपण आणि ते असा काही फ़रक राहिलेला नसतो. फ़क्त माणसांची नावं आणि चेहरे बदलतात.

No comments: