Sunday 5 May 2019

माफ़िनामा

आज रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे निवांत घरातली आवरुन झाल्यावर आज टॉम ॲण्ड जेरीची कार्टुन पहात बसले होते. आता तुम्हाला वाटेल कि हे काय वय आहे का बाईंच कार्टुन पहाण्याचे. पण आपण पाहिलेल्या वाचलेल्या गोष्टीची खरी गंमत हि असते कि, एकाच गोष्टीचे वेगवेगळ्या वयात आपल्याला वेगवेगळे अर्थ समजतात.
इथे या कार्टुन मधेही जेरी टॉमची खोडी काढतो आणि त्याला धडा शिकविण्यासाठी टॉम त्याच्या मागे लागतो. त्यांच्या या भांडणात टॉमच्या अंगावर एक कपाट पडतं आणि टॉम स्वर्गाच्या पाय-या चढायला लागतो. स्वर्गाच्या दारात, स्वर्गाच्या प्रवासाच्या ट्रेन मधे जाण्यासाठी सर्व मांजर आत्म्यांची मोठी रांग असते. तिथला मांजर देवदूत प्रत्येकाला त्याच्या कर्मांची यादी वाचुन दाखवतो आणि स्वर्गात जायचं का नरकात ते सांगतो. टॉमचा नंबर आल्यावर देवदूत त्याला सांगतो की, तुला या ट्रेन मधे जागा नाही कारण, तु तुझं सगळं आयुष्य एका बिचा-या छोट्याश्या उंदराला त्रास देण्यात वाया घालवलं आहेस. त्यामुळे तुला नरकाच्या आगीत ढकलण्यात येईल. तिथे एक कुत्रा तुला आगीत भाजून काढेल. हे सगळं ऐकल्यावर टॉम गयावया करतो आणि देवदूताला हे टाळण्यासाठी मार्ग विचारतो. देवदूत त्याला सांगतो कि, मी तुला एक तास देतो. त्या वेळात, जेरीला माफ़िनामा लिहून दे आणि त्याच्यावर त्याची सही घेऊन ये. इतकं होऊनही टॉम मिळालेल्या एक तासात जेरीकडुन कपटाने, घाबरवून, आमिष देऊन सही घ्यायचा प्रयत्न करतो. जेरीची खोटी सही करायचा प्रयत्न करतो. पण माफ़ी काही मागत नाही. जेव्हा त्याला दिलेला एक तास संपत येतो तेव्हा त्याला नरकातला कुत्रा आणि  आग दिसायला लागते. तेव्हा  कुठे तो  जेरीची माफ़ी मागतो आणि त्याची  सही मिळवतो. अर्थात, हे कार्टुन असल्याने शेवटी हे सगळं टॉमचं स्वप्न असत आणि त्यातुन जागं झाल्यावर तो जेरीशी प्रेमाने वागायचं असं ठरवतो.
तसं पहाता ते फ़क्त एक कार्टुन आहे पण त्यातुन शिकण्यासारख़ं खूप काही आहे. आपल्या आयुष्यात तर असे अनेक जेरी असतात. ज्यांना त्रास देण्यासाठी आपण आपला बहुमूल्य वेळ, बुद्धी खर्च करत असतो. टॉम आणि जेरी जसे एकाच छताखाली रहातात. तसेच, आपले नातेवाईक, कार्यालयातील सहकारी एकाच छताखाली असतात. त्यांनी परस्परांच्या कमतरता दाखवण्यासाठी केलेली चढाओढ़, यात वाया घालवलेला वेळ आणि बुद्धी यांचा उपयोग कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपली संस्था वाढविण्यासाठी होऊ शकतो. कुटुंब असो अथवा आपले कार्यालय छोट्यातल्या छोट्या व्यक्तिलाही काहितरी महत्व असते. त्या छोट्या व्यक्तिला कमी लेखून शेवटी कुटुंब असो अथवा संस्था ही विनाशाच्या आगीत जाणार हे निश्चित असते. कार्टुन असल्यामुळे वरच्या कथेत टॉमला जेरीकडे माफ़ी मागायला एक संधी मिळाली पण आपल्याला ती मिळणार नसते. त्यामुळे, आपल्या आयुष्यात इतके जेरी निर्माण करु नका की माफ़ी मागायलाही वेळ राहणार नाही. सर्वात महत्वाचे जेव्हा आपण टॉम होऊन कोणालातरी त्रास देतो तेव्हा आपल्या डोक्यावरही कुणीतरी एक टॉम असतोच.

No comments: