Saturday 4 May 2019

हाफ़ डे


आज ऑफ़िस मधुन लवकर घरी आले कारण, शनिवार असल्यामुळे ऑफ़िस फ़क्त अर्धा दिवस होते. हाफ़ डे च्या दिवशी ऑफ़िस मधल्या सगळ्यांची लगबग ही बघण्यासारखी असते. सुट्टी वाया जाऊ नये म्हणुन या दिवशी ऑफ़िस मधे अगदी शंभर टक्के असलेली उपस्थिती, आपले काम वेळेत आवरण्यासाठी लगबग करणारा आणि जमल्यास 10 मिनीट आधी घरी जाऊ द्या अशी विनंती करण्यासाठी तयार स्टाफ़ असे वातावरण असते. यातच कुठेतरी ऑफ़िस रोजच्या वेळेपेक्षा लवकर असल्यामुळे सकाळी नास्ता न करता धावत पळत मस्टर गाठण्यासाठी आलेल्या महिलांची एक छोटीशी नास्ता पार्टी रंगते. ऑफ़िस मधे भेटलेल्या परंतू नंतर जिवाभावाच्या मैत्रिणी झालेल्यांचे ऑफ़िस नंतर सिनेमा बघायला जायचे प्लान ठरतात. या सगळ्या गोंधळातही काही व्यक्ति मात्र आपल्या कामात मग्न असतात. त्यांचे प्लान्स मात्र ऑफ़िस झाल्यावरही जास्तवेळ काम करण्याचे असतात. ऑफ़िस सुटण्याच्यावेळी फ़ोनवर बोलताना एखादीच्या चेह-यावरचं गोड हसु कुणा खास व्यक्ति बरोबर लंच डेट नक्की झाल्याचे सांगत असतं. एखादी माऊली उद्या आपल्या पिल्लांसाठी काय खास मेनू तयार करता येईल? या विचारात जाऊन मनाने तयारीसाठी लागलेली असते. घरीसुद्धा ती छोटी पाखरं आपली आई किंवा बाबा आज लवकर घरी येणार ही आस लावून बसलेली असतात.
माझ्या लहानपणी माझ्या आईचं एस.टी. महामंडळाच ऑफ़िस शनिवारी हाफ़ डे होतं. त्या शनिवारी आईच्या सगळ्या वेळावर फ़क्त आम्हा भावंडांचा हक्क होता. त्या दिवशी आईला ऑफ़िस मधुन यायला 10 मिनिट जरी उशीर झाला तरी, आमचा सगळा राग ऑफ़िस मधल्या कधी न पाहिलेल्या तिच्या सरांवर असायचा. पण, आता काळाचं चक्र बघा कसं फ़िरतं, मी आता एस.टी. महामंडळात काम करते आणि हाफ़ डे ला लवकर जायची परवानगी कोणी मागितली की, काम पुर्ण करुन जायचं अस ऐकवते. तेव्हा कुठेतरी कोणाची तरी पाख़रं जोशी मॅडम नावाच्या व्यक्तिवर रागवत तर नसतील ना.
तसंही काळाच्या ओघात ब-याच कार्यालयातून हाफ़ डे ही संकल्पना हद्दपार झाली आहे. शनिवार- रविवार सुट्टी हे आताच नविन समिकरण आहे. शाळा, कॉलेज व आस्थापना यांना आजकाल फ़क्त आणिबाणीच्या प्रसंगी अर्धी सुट्टी दिली जाते. पण शाळा, कॉलेज मधले आयुष्य इतकं निरागस आणि काहीस बेफ़िकीर असतं ना की आणिबाणीच्या प्रसंगी मिळालेली सुट्टी देखील मजेत उपभोगली जाते.
तर असा हा हाफ़ डे आजकाल काहीसा लुप्त होत चाललेला तरी एक वेगळीच मजा देणारा नक्किच असतो. तो प्रत्येकाने अनुभवायला हवाच!

1 comment:

Unknown said...

Chhan ga tai