Monday, 25 May 2009

फ़िरता करंडक

अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धेत फ़िरता करंडक देण्याची पद्धत असते. हा फ़िरता करंडक दरवर्षी जिंकणारा समुह घेउन जातो. फ़िरता करंडक हि अतिशय छान कल्पना आहे. असा करंडक देउन सहभागी संघांचा सन्मानही केला जातो आणि करंडकावरील दरवर्षीचा खर्चही वाचतो. पण जेव्हा ही कल्पना जेव्हा तुम्हाला मिळणा-या भेटिंना लागु पडेल तेव्हा कसं वाटेल?

आजकाल कोणालाही भेटायला जाताना भेटवस्तु नेण्याची एक पद्धत आहे किंबहुना भेटवस्तुची किंमत पाहुनच प्रेम ठरवलं जातं. अगदी १ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस असुदे नाहितर आजोबांची पंच्याहत्तरी भेटवस्तु दिल्या घेतल्या जातात. एक काळ असा होता जेव्हा मिळणा-या भेटवस्तुंचं अप्रुप होतं. आज घरात खेळण्यानी भरलेली खोली असताना गावाहुन आजीने पाठविलेल्या भातुकलीच्या भांड्यांचं काय अप्रुप वाटणार? हे तर झालं न कळत्या लहान मुलांचं पण मोठी माणसं महिन्याला कितेक हजार कमवणारी "आमचं स्टेटस, आमची लेवल" अशा गोंडस शब्दांखाली भेटवस्तुंवर हजारो रुपये खर्च करतात. यातुनच साठत जातो प्रत्येक घरात भेटवस्तुंचा एक डोंगर. हा डोंगर मग घरातल्या माळ्यावर जागा बळकावतो. या डोंगरात अनेक वस्तु असतात जसे दिवाणखान्यात ठेवायचे शो-पिस, फोटो फ़्रेम, डिनर सेट्स असलं बरचं काही. आता या डोंगराचं करायचं काय हा घरातल्या करत्या बाई समोरचा मोठा प्रश्न असतो. मग या सगळ्या पहाडातल्या वस्तुंचा फ़िरता करंडक होतो. घरी मग कुळधर्माची सवाष्ण जेवायला आली कि तिला एखादा छानसा शो पिस दिला जातो तो अर्थातच भेटवस्तुंच्या डोंगरातुन शोधलेला असतो. डिनर सेट्स नव्या लग्न झालेल्या मुलीला हौशीने दिले जातात. घरी आलेली सवाष्ण, लग्न झालेल्या मुली यांच्या घरातही आधिच भेटवस्तुंचे डोंगर असतातच त्यात ही नवी भर पडल्यावर त्या तरी काय करणार बिचा-या! त्या ही सगळया नविन आलेल्या भेटी माळ्यावर टाकतात आणि मग "फ़िरता करंडक"! सगळ्या भेटी नविन सवाष्णीला नव्या व्यक्तिला देणे. असा फ़िरता करंडक चालुच रहातो.

आता हा "फ़िरता करंडक" व्हायला नको तर काय करायचे? सोपा उपाय "सरळ पैसे देऊन टाकायचे. त्यांचं काय काहीपण करता येतं." असा बोलणारा एक वर्ग असतो. पण जेव्हा जवळच्या नात्यातल्या लग्नात मानपानाची एक साडी मिळत नाही हातावर पैसे टेकवले जातात तेव्हा "काय हे रितच नाही आजकाल लोकांना" असंही बोलणारे हेच लोक असतात. लग्नासारख्या समारंभात तर वर आणि वधु यांच्या आई-वडिलांना मानपानाच्या नावाखाली डझनाहुनही जास्त साड्या आणि कपडे मिळतात. आता इतक्या कपड्यांच करायचं काय? जाऊ द्या पेटीत! पुढच्या मुलाच्या नाहितर मुलीच्या लग्नात आहेरात द्यायला उपयोग होईल. शेवटचं कार्य असेल घरातलं तर मग आहेतच कि जुन्या मैत्रिणींचे वाढदिवस, नातेवाईकांकडे असलेली कार्य! तिथेही आहेर द्यावा लागतोच. मग साड्यांचाही फ़िरता करंडक होतो. "वापरली नव्हती मी ती साडी, दिली तर काय फ़रक पडतो?" असे प्रश्न विचारले जातात. पण मनात काही वेगळचं असतं "कसलं फ़ालतू कापड आहे. असल्या टुकार साड्या मी नाही बाई नेसतं." ही मनातली वाक्य असतात.

अशा या फ़िरत्या करंडकाच्या नादात पैसा आणि भावना या दोन्ही गोष्टिंचा बाजार मांडला जातो. असा तुम्ही फ़िरवलेला करंडक परत तुमच्याकडे आला तर तुम्हाला परत मिळाला तर तुम्हाला कसं वाटेल? हा विचार करंडक फ़िरवण्याआधी नक्की करा...

2 comments:

अपर्णा said...

खरंच आहे हो तुमचं म्हणणं. इथे गिफ़्ट रिसीट नावाचा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही घेतलेल्या वस्तुची किंमत प्रिंट न केलेली पावती. तुमच्याकडे ती वस्तु दोन वेळा आली असेल तर त्या दुकानातून तुम्ही दुसरी तुम्हाला आवडणारी वस्तु घेऊ शकता. अर्थात त्यावेळी त्या वस्तुची किंमत तुम्हाला कळते. पण निदान आपल्या आवडीचे किंवा कपड्याच्या बाबतीत मापाचे कपडे आपण घेऊ शकतो. भारतात ही पद्धत आली तर बरे होईल. पण कस्टमर सर्विस या नावाने दुकानांमध्ये सध्यातरी बोंबच आहे.

Prashant said...

छान!

दोन वेगळे पर्याय मला ठीक वाटतात.
एक तर सरळ पैसे किंवा gift coupons देता येतात. म्हणजे हवी ती वस्तू ज्याला त्याला घेता येते. यात उगाचच रीत वगैरे बाऊ करू नये. पैस्याचा अपव्यय व नसत्या कटकटी टाळता आल्या तर आनंद तर होईलच.

दुसरी जरा कमी effective आहे. म्हणजे ज्याला भेटवस्तू द्यायची आहे, त्यालाच विचारचे की काय हवं आहे. जर अगदी जवळचा कोणी असेल आणि स्वतःला महित असेल की कोणती वस्तू द्यावी, तर ते उत्कृष्टच, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी विचार करून भेट दिल्याचा आनंदही होतो. अशावेळेस, जर प्रासंगीक भेट असेल.... लग्न / वाढदिवस वगैरे, तर कोणीतरी किंवा स्वतः भेट स्विकारणार्‍याने सगळ्या जवळच्या लोकांशी भेटीबद्दल संधान साधून असावे. म्हणजे कुठली वस्तू अधिक घेतली जात नाही.


लिखाणाबद्दल एक दुरुस्ती:
’-य’ चुकीचा लिहिलेला आहे. तेथे ’र्‍य’ असे लिहावे.
अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1