Wednesday, 15 May 2019

रिप्लेसमेंट



सेवानिवृत्तीचा प्रसंग प्रत्येक नोकरी करणा-या व्यक्तिच्या आयुष्यात नक्कीच येतो. त्यातही भारतीय शिक्षण पद्धतीच्या कृपेने अनेकांच्या जन्मदिनांकाची नोंद 1 जुन अशीच केलेली असते. त्यामुळे सरकारी आस्थापनांमध्ये मे महिनाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्ती होते. या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात संबंधीत कर्मचा-याचे सह कर्मचारी, निवृत्त होणा-या व्यक्तिच्या जुन्या आठवणींना आपल्या भाषणां मधुन उजाळा देतात, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या व्यक्तिमत्वाबाबत चार चांगल्या गोष्टी बोलतात. कार्यालयीन कामात असलेल्या निष्णातपणा (हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त असतो! ) कौतुक करतात आणि त्यांची जागा कशी कोणीच घेऊ शकत नाही हे जवळचे सहकारी अगदी डोळ्यात पाणी आणुन सांगतात. या सगळ्या समारंभात तसा नेहमीच वैयक्तिक स्तरावर जवळीक टाळणा-या उपस्थित अधिकारी वर्गाने मात्र सेवानिवृत्त होणा-या व्यक्तिची रिप्लेसमेंट शोधलेली असते.

आता रिप्लेसमेंटची वेळ आणि कारण हे फ़क्त सेवानिवृत्ती हे असतं असं नाही. सेवानिवृत्तीच्या रिप्लेसमेंटमधे निवृत्त होणा-या माणसाच्या कामासाठी फ़क्त नवा माणुस निवडला जातो. पण, आपण करत असलेली नोकरी आपल्याला एक व्यक्ती म्हणुन अर्तंगत मानसिक पातळीवर किती रिल्पेस करते हे आपण कधीच पहात नाही किंवा ते काळाच्या ओघात आपल्याला जाणवत नाही.

लहानपणी घरात कोणतेही नविन उपकरण आणले कि मी कधीच त्याच्या सोबत येणार म्यनुअल वाचायचे नाही. ते उपकरण सरळ वापरायचे. मग ते वापरायची पद्धत त्याचे फ़िचर्स हळूहळू आपोआप कळायचे. पण कार्यालयीन कामामुळे लागलेला सवयीचा भाग म्हणुन आता हातात आलेला कुठलाही कागद वाचल्याशिवाय सुटत नाही. आता एखादे नविन उपकरण आणले कि, ते उपकरण रहाते बाजुला आणि सर्वात आधी त्याच्या म्यनुअलचे वाचन सुरु होते. पुर्वी माझे वडिल म्यनुअल वाचायचे तेव्हा ते काम निरुपयोगी आणि कंटाळवाणे क वाटायचे. एकदा आईने मला घरातली रद्दी आवरण्याचे काम दिले आणि ती तिथुन निघुन गेली. बराच वेळ झाला मी ते काम शांतपणे करत होते. इतक्या छोट्या कामासाठी मी इतका वेळ का घेते आहे हे पहायला आई आली. मी आपल्याच तंद्रीत काम करत होते. तीने मला विचारले " काय करते आहेस? इतका वेळ का लागतो आहे?" मी तीला शांतपणे उत्तर दिले " रद्दी पेपर डेटवाइज आणि पेजवाइज लावते आहे." या नंतर घरात कितीतरी दिवस हा प्रसंग हसण्याचे कारण बनला होता. इथे कुठेतरी माझ्या नोकरीने माझ्यातल्या बेदरकार आणि बेशिस्त व्यक्तिला रिप्लेस करुन जबाबदार आणि शिस्तप्रिय केले होते.

माझ्या नोकरीच्या सुरवातीला कोणताही कर्मचारी लेखा शाखेत वैयक्तिक अडचणींची यादी घेऊन विनंती करायला आला कि माझे वरिष्ठ अधिकारी त्याचे सगळे बोलणे ऐकुन घ्यायचे. पण निर्णय मात्र नियमानुसार घ्यायचे. तेव्हा लोकांच्या वैयक्तिक अडचणी ऐकुन मला कमालीचे वाईट वाटायचे. असं वाटायचे हे साहेब इतके कशाला नियम पहात बसले आहेत. मदत करायला हवी. पण प्रशासन भावनांच्या आहारी जाऊन चालत नसते. ते नियमानुसार चालते. हे कळायला लागल्यावर माझ्यातल्या भावनांच्या आवेगाला नियमांच्या चाकोरीने रिप्लेस केलेच.

आपल्या करिअरच्या सुरवातीला आपल्या आधी संस्थेत असलेल्या लोकांचे जे वागणे आपल्याला चुक वाटते, ते आपण कसे वेग़ळे आहोत हे सांगत आपण ते आत्मसात करत असतो. यात सकारात्मक बदल असतात तसेच नकारात्मक बदलही असतात. एका कालावधी नंतर आपण आणि ते असा काही फ़रक राहिलेला नसतो. फ़क्त माणसांची नावं आणि चेहरे बदलतात.

Tuesday, 7 May 2019

गोल्डन अवर

कोणत्याही व्यक्तिच्या बाबत वैद्यकिय आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्या प्रसंगा नंतर येणारे काही तास खुप महत्वाचे असतात. त्या तासात मिळणारे उपचार त्या व्यक्तिचे जिवन किंवा मरण ठरविणारे असतात. त्यामुळे या तासांना वैद्यकिय भाषेत गोल्डन अवर असे म्हणतात. हृदय विकार, अर्धांगवायुचे रुग्ण यांच्यासाठी गोल्डन अवरचे विशेष महत्व आहे.गोल्डन अवर हि संकल्पना नेहमी फ़क्त शारिरीक स्वास्थ्यासाठी वापरली जाते. पण, मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कित्तेक गोल्डन अवर्स आपल्या हातून निसटुन जातात आणि मग आपल्याला मनाचे विकार जडतात आणि विचारांना अर्धांगवायुचा झटका येतो.

तसं पहायला गेलं तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा दिवस अगदी आखिव रेखिव असतो. सकाळी उठणे, घर आवरुन ऑफ़िस गाठणे, ऑफ़िस मधे काम करणे, घरी येणे आणि झोपणे. तुम्ही गृहिणी असाल तर सकाळी घरच काम आवरणे, मुलांना शाळेत पाठवणे, त्यांचा अभ्यास घेणे, थोडा आराम करणे, परत काम करणे यात पुर्ण दिवस जातो. आता या सगळ्या रेखिव आयुष्यात गोल्डन अवर्स शोधायला वेळ मिळतोच कुठे? खरं पहाता काय शोधायचे आहे हेच माहित नसताना शोधायचं काय आणि कसं हाच मोठा प्रश्न असतो. कारण, प्रत्येकासाठी असलेला गोल्डन अवर हा निरनिराळा असतो.

शाळा सुटल्यावर घरी येऊन कधी एकदा आईला शाळेतल्या गमतीजमती सांगतो असं झालेल्या पिटुकल्यासाठी शाळेतुन आल्यावरची 15 मिनिट्स गोल्डन अवर असतात. तेव्हा आईने प्रेमाने जवळ घेऊन केलेली विचारपुस त्या पिटुकल्यासाठी खुप मोठ्ठ टॉनिक असतं. कॉलेज मधे त्याच्याकडे आपण चोरुन पाहणे आणि त्याने त्याचवेळी आपल्याला पाहुन एक छान स्माईल देणे हा सोनेरी क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येतोच. संसाराच्या रोजच्या चक्रातुन बदल म्हणुन आपल्या "अहो किंवा अरे" नी प्लान केलेली सरप्राईज डेट गोल्डन अवर असते. दुरदेशी रहाणारी नातवंडे घरी आल्यावर त्यांचे हट्ट पुरविताना खर्च केलेले कित्तेक तास आजी आजोबांसाठी गोल्डन अवर्स असतात. आयुष्याच्या उतरणीला जुन्या आठवणी काढत, आपल्या जोडीदारा सोबत हसत झोपाळ्यावर झुलणं हा पण एक वेगळाच अनुभव असणार ना!

प्रत्येक नात्यात असे सोनेरी तास असतात ते शोधणं आणि जपणं खुप महत्वाचं असतं. जगातली कुठल्याच भौतीक सुखाची तुलना या गोल्डन अवर्स मधे असलेल्या सुखाशी करणे शक्य नाही. असं म्हणतात कि आजपर्यत विज्ञानाला मनाचा शोध लागलेला नाही. पण, मन कुठे आहे? असा प्रश्न आला कि हात फ़क्त हृदयाकडे जातो. तेव्हा त्याची काळजी घ्यायची असेल तर नात्यातले गोल्डन अवर्स शोधा. डॉक्टर होणे प्रत्येकाला जमतेच असे नाही पण आपल्या नात्यातल्या लोकांना गोल्डन अवर्स देऊन त्याचे आंणि आपले मन निरोगी करायला प्रत्येकाला नक्कीच जमणे शक्य आहे.

Sunday, 5 May 2019

माफ़िनामा

आज रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे निवांत घरातली आवरुन झाल्यावर आज टॉम ॲण्ड जेरीची कार्टुन पहात बसले होते. आता तुम्हाला वाटेल कि हे काय वय आहे का बाईंच कार्टुन पहाण्याचे. पण आपण पाहिलेल्या वाचलेल्या गोष्टीची खरी गंमत हि असते कि, एकाच गोष्टीचे वेगवेगळ्या वयात आपल्याला वेगवेगळे अर्थ समजतात.
इथे या कार्टुन मधेही जेरी टॉमची खोडी काढतो आणि त्याला धडा शिकविण्यासाठी टॉम त्याच्या मागे लागतो. त्यांच्या या भांडणात टॉमच्या अंगावर एक कपाट पडतं आणि टॉम स्वर्गाच्या पाय-या चढायला लागतो. स्वर्गाच्या दारात, स्वर्गाच्या प्रवासाच्या ट्रेन मधे जाण्यासाठी सर्व मांजर आत्म्यांची मोठी रांग असते. तिथला मांजर देवदूत प्रत्येकाला त्याच्या कर्मांची यादी वाचुन दाखवतो आणि स्वर्गात जायचं का नरकात ते सांगतो. टॉमचा नंबर आल्यावर देवदूत त्याला सांगतो की, तुला या ट्रेन मधे जागा नाही कारण, तु तुझं सगळं आयुष्य एका बिचा-या छोट्याश्या उंदराला त्रास देण्यात वाया घालवलं आहेस. त्यामुळे तुला नरकाच्या आगीत ढकलण्यात येईल. तिथे एक कुत्रा तुला आगीत भाजून काढेल. हे सगळं ऐकल्यावर टॉम गयावया करतो आणि देवदूताला हे टाळण्यासाठी मार्ग विचारतो. देवदूत त्याला सांगतो कि, मी तुला एक तास देतो. त्या वेळात, जेरीला माफ़िनामा लिहून दे आणि त्याच्यावर त्याची सही घेऊन ये. इतकं होऊनही टॉम मिळालेल्या एक तासात जेरीकडुन कपटाने, घाबरवून, आमिष देऊन सही घ्यायचा प्रयत्न करतो. जेरीची खोटी सही करायचा प्रयत्न करतो. पण माफ़ी काही मागत नाही. जेव्हा त्याला दिलेला एक तास संपत येतो तेव्हा त्याला नरकातला कुत्रा आणि  आग दिसायला लागते. तेव्हा  कुठे तो  जेरीची माफ़ी मागतो आणि त्याची  सही मिळवतो. अर्थात, हे कार्टुन असल्याने शेवटी हे सगळं टॉमचं स्वप्न असत आणि त्यातुन जागं झाल्यावर तो जेरीशी प्रेमाने वागायचं असं ठरवतो.
तसं पहाता ते फ़क्त एक कार्टुन आहे पण त्यातुन शिकण्यासारख़ं खूप काही आहे. आपल्या आयुष्यात तर असे अनेक जेरी असतात. ज्यांना त्रास देण्यासाठी आपण आपला बहुमूल्य वेळ, बुद्धी खर्च करत असतो. टॉम आणि जेरी जसे एकाच छताखाली रहातात. तसेच, आपले नातेवाईक, कार्यालयातील सहकारी एकाच छताखाली असतात. त्यांनी परस्परांच्या कमतरता दाखवण्यासाठी केलेली चढाओढ़, यात वाया घालवलेला वेळ आणि बुद्धी यांचा उपयोग कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपली संस्था वाढविण्यासाठी होऊ शकतो. कुटुंब असो अथवा आपले कार्यालय छोट्यातल्या छोट्या व्यक्तिलाही काहितरी महत्व असते. त्या छोट्या व्यक्तिला कमी लेखून शेवटी कुटुंब असो अथवा संस्था ही विनाशाच्या आगीत जाणार हे निश्चित असते. कार्टुन असल्यामुळे वरच्या कथेत टॉमला जेरीकडे माफ़ी मागायला एक संधी मिळाली पण आपल्याला ती मिळणार नसते. त्यामुळे, आपल्या आयुष्यात इतके जेरी निर्माण करु नका की माफ़ी मागायलाही वेळ राहणार नाही. सर्वात महत्वाचे जेव्हा आपण टॉम होऊन कोणालातरी त्रास देतो तेव्हा आपल्या डोक्यावरही कुणीतरी एक टॉम असतोच.

Saturday, 4 May 2019

हाफ़ डे


आज ऑफ़िस मधुन लवकर घरी आले कारण, शनिवार असल्यामुळे ऑफ़िस फ़क्त अर्धा दिवस होते. हाफ़ डे च्या दिवशी ऑफ़िस मधल्या सगळ्यांची लगबग ही बघण्यासारखी असते. सुट्टी वाया जाऊ नये म्हणुन या दिवशी ऑफ़िस मधे अगदी शंभर टक्के असलेली उपस्थिती, आपले काम वेळेत आवरण्यासाठी लगबग करणारा आणि जमल्यास 10 मिनीट आधी घरी जाऊ द्या अशी विनंती करण्यासाठी तयार स्टाफ़ असे वातावरण असते. यातच कुठेतरी ऑफ़िस रोजच्या वेळेपेक्षा लवकर असल्यामुळे सकाळी नास्ता न करता धावत पळत मस्टर गाठण्यासाठी आलेल्या महिलांची एक छोटीशी नास्ता पार्टी रंगते. ऑफ़िस मधे भेटलेल्या परंतू नंतर जिवाभावाच्या मैत्रिणी झालेल्यांचे ऑफ़िस नंतर सिनेमा बघायला जायचे प्लान ठरतात. या सगळ्या गोंधळातही काही व्यक्ति मात्र आपल्या कामात मग्न असतात. त्यांचे प्लान्स मात्र ऑफ़िस झाल्यावरही जास्तवेळ काम करण्याचे असतात. ऑफ़िस सुटण्याच्यावेळी फ़ोनवर बोलताना एखादीच्या चेह-यावरचं गोड हसु कुणा खास व्यक्ति बरोबर लंच डेट नक्की झाल्याचे सांगत असतं. एखादी माऊली उद्या आपल्या पिल्लांसाठी काय खास मेनू तयार करता येईल? या विचारात जाऊन मनाने तयारीसाठी लागलेली असते. घरीसुद्धा ती छोटी पाखरं आपली आई किंवा बाबा आज लवकर घरी येणार ही आस लावून बसलेली असतात.
माझ्या लहानपणी माझ्या आईचं एस.टी. महामंडळाच ऑफ़िस शनिवारी हाफ़ डे होतं. त्या शनिवारी आईच्या सगळ्या वेळावर फ़क्त आम्हा भावंडांचा हक्क होता. त्या दिवशी आईला ऑफ़िस मधुन यायला 10 मिनिट जरी उशीर झाला तरी, आमचा सगळा राग ऑफ़िस मधल्या कधी न पाहिलेल्या तिच्या सरांवर असायचा. पण, आता काळाचं चक्र बघा कसं फ़िरतं, मी आता एस.टी. महामंडळात काम करते आणि हाफ़ डे ला लवकर जायची परवानगी कोणी मागितली की, काम पुर्ण करुन जायचं अस ऐकवते. तेव्हा कुठेतरी कोणाची तरी पाख़रं जोशी मॅडम नावाच्या व्यक्तिवर रागवत तर नसतील ना.
तसंही काळाच्या ओघात ब-याच कार्यालयातून हाफ़ डे ही संकल्पना हद्दपार झाली आहे. शनिवार- रविवार सुट्टी हे आताच नविन समिकरण आहे. शाळा, कॉलेज व आस्थापना यांना आजकाल फ़क्त आणिबाणीच्या प्रसंगी अर्धी सुट्टी दिली जाते. पण शाळा, कॉलेज मधले आयुष्य इतकं निरागस आणि काहीस बेफ़िकीर असतं ना की आणिबाणीच्या प्रसंगी मिळालेली सुट्टी देखील मजेत उपभोगली जाते.
तर असा हा हाफ़ डे आजकाल काहीसा लुप्त होत चाललेला तरी एक वेगळीच मजा देणारा नक्किच असतो. तो प्रत्येकाने अनुभवायला हवाच!

फ़ॉर्गिव्ह आणि फ़ॉर्गेट


आजच फ़ेसबुक वॉलवर फ़ॉर्गिव्ह आणि फ़ॉर्गेट या आशयाची एक शेअर केलेली पोस्ट वाचली. पोस्टचा आशय होता कि, मनात कुणासाठीही किंतु ठेऊ नका. आपल्याच मनाच्या शांतीसाठी लोकांना माफ़ करा किंवा त्यांच्या चूका विसरुन जा. पण हे खरंच इतंक सोपं असतं?
लहानपणी मुलांना शिस्त लागावी म्हणुन आई एखादी चापट मारते आणि ते लहान मूल रडायला लागते. पण रडत रडत ते लहान मूल पुढच्या 2 मिनिटात परत त्याच आईकडे जातं जिने त्याला चापट मारलेली असते. आईपण त्या मुलाला जवळ घेऊन कुरवाळते आणि शांत करते. आयुष्यात फ़ॉर्गिव्ह/ फ़ॉर्गेट ची सुरवात इथुन होते. या नात्यात हे घडतं कारण, आई आणि मूल हे एकमेकांसाठी त्याचं विश्व असतात.
पण घराबाहेरच्या जगात असं होत नाही. तिथे बहुसंख्य व्यक्ति या लक्षात ठेवणे आणि सूड घेणे (रीमेंबर आणि रीवेंज) याप्रमाणेच वागतात. दरवेळी सूड घेणे म्हणजे शारिरीक इजा पोहचविणे असे नसते. ब-याच वेळा आपल्या मनात आकस असलेल्या व्यक्तिंची त्यांच्या पाठीमागे केलेली निंदानालस्ती, त्यांच्या सामाजिक प्रतिमेला धक्का लागावा यासाठी केलेले सगळे प्रयत्न हे एक प्रकारचा सूडच असतात. पण हा सूड घेताना प्रत्येक माणुस विसरतो कि आपण केलेल्या प्रत्येक कृतीला/ क्रियेला  प्रतिक्रिया ही येणारच असते. या क्रिया आणि प्रतिक्रियेतुन कोणाचीच सुटका नसते. त्यामुळे फ़ॉर्गिव्ह आणि फ़ॉर्गेट शिकण्याआधी झालेल्या घटनांवर, वादविवादांवर आपली दिली जाणारी प्रतिक्रिया, केलेली कृती कश्याप्रकारे संयमित असेल याचा विचार प्रत्येकाने केला तर ख-या अर्थाने मन: शांती प्राप्त होईल.

फ़ेसबुक पेज सुरवात


सर्वांचे माझ्या मनाच्या प्रिझम मधे स्वागत. प्रिझम हे नाव वाचुन त्याचा भौतिक शात्राशी काही संबंध आहे असं समजू नका बरं. हा प्रिझम आहे माझ्या मनाचा. भौतिक शात्रातल्या प्रिझम मधे एका बाजुने प्रकाश (white light) आत गेला कि त्याच दुस-या बाजुने त्याच प्रकाशाचे सात रंग (rainbow) बाहेर येताना दिसतात. आपल्या मनाचंही तर तसंच आहे. एक विचार आपण ऐकतो आणि आपलं मनात त्याचं मंथन करुन आपण त्यातुन अनेक नवे विचार मांडतो. हे विचार कधी असतात निळ्या निरभ्र आकाशा सारखे तर कधी उगवतीच्या सुर्याच्या कोमल केशरी किरणां सारखे. अशाच काही विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे पान सुरु करण्याचा हा एक प्रयत्न आहे.