Monday 25 May 2009

फ़िरता करंडक

अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धेत फ़िरता करंडक देण्याची पद्धत असते. हा फ़िरता करंडक दरवर्षी जिंकणारा समुह घेउन जातो. फ़िरता करंडक हि अतिशय छान कल्पना आहे. असा करंडक देउन सहभागी संघांचा सन्मानही केला जातो आणि करंडकावरील दरवर्षीचा खर्चही वाचतो. पण जेव्हा ही कल्पना जेव्हा तुम्हाला मिळणा-या भेटिंना लागु पडेल तेव्हा कसं वाटेल?

आजकाल कोणालाही भेटायला जाताना भेटवस्तु नेण्याची एक पद्धत आहे किंबहुना भेटवस्तुची किंमत पाहुनच प्रेम ठरवलं जातं. अगदी १ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस असुदे नाहितर आजोबांची पंच्याहत्तरी भेटवस्तु दिल्या घेतल्या जातात. एक काळ असा होता जेव्हा मिळणा-या भेटवस्तुंचं अप्रुप होतं. आज घरात खेळण्यानी भरलेली खोली असताना गावाहुन आजीने पाठविलेल्या भातुकलीच्या भांड्यांचं काय अप्रुप वाटणार? हे तर झालं न कळत्या लहान मुलांचं पण मोठी माणसं महिन्याला कितेक हजार कमवणारी "आमचं स्टेटस, आमची लेवल" अशा गोंडस शब्दांखाली भेटवस्तुंवर हजारो रुपये खर्च करतात. यातुनच साठत जातो प्रत्येक घरात भेटवस्तुंचा एक डोंगर. हा डोंगर मग घरातल्या माळ्यावर जागा बळकावतो. या डोंगरात अनेक वस्तु असतात जसे दिवाणखान्यात ठेवायचे शो-पिस, फोटो फ़्रेम, डिनर सेट्स असलं बरचं काही. आता या डोंगराचं करायचं काय हा घरातल्या करत्या बाई समोरचा मोठा प्रश्न असतो. मग या सगळ्या पहाडातल्या वस्तुंचा फ़िरता करंडक होतो. घरी मग कुळधर्माची सवाष्ण जेवायला आली कि तिला एखादा छानसा शो पिस दिला जातो तो अर्थातच भेटवस्तुंच्या डोंगरातुन शोधलेला असतो. डिनर सेट्स नव्या लग्न झालेल्या मुलीला हौशीने दिले जातात. घरी आलेली सवाष्ण, लग्न झालेल्या मुली यांच्या घरातही आधिच भेटवस्तुंचे डोंगर असतातच त्यात ही नवी भर पडल्यावर त्या तरी काय करणार बिचा-या! त्या ही सगळया नविन आलेल्या भेटी माळ्यावर टाकतात आणि मग "फ़िरता करंडक"! सगळ्या भेटी नविन सवाष्णीला नव्या व्यक्तिला देणे. असा फ़िरता करंडक चालुच रहातो.

आता हा "फ़िरता करंडक" व्हायला नको तर काय करायचे? सोपा उपाय "सरळ पैसे देऊन टाकायचे. त्यांचं काय काहीपण करता येतं." असा बोलणारा एक वर्ग असतो. पण जेव्हा जवळच्या नात्यातल्या लग्नात मानपानाची एक साडी मिळत नाही हातावर पैसे टेकवले जातात तेव्हा "काय हे रितच नाही आजकाल लोकांना" असंही बोलणारे हेच लोक असतात. लग्नासारख्या समारंभात तर वर आणि वधु यांच्या आई-वडिलांना मानपानाच्या नावाखाली डझनाहुनही जास्त साड्या आणि कपडे मिळतात. आता इतक्या कपड्यांच करायचं काय? जाऊ द्या पेटीत! पुढच्या मुलाच्या नाहितर मुलीच्या लग्नात आहेरात द्यायला उपयोग होईल. शेवटचं कार्य असेल घरातलं तर मग आहेतच कि जुन्या मैत्रिणींचे वाढदिवस, नातेवाईकांकडे असलेली कार्य! तिथेही आहेर द्यावा लागतोच. मग साड्यांचाही फ़िरता करंडक होतो. "वापरली नव्हती मी ती साडी, दिली तर काय फ़रक पडतो?" असे प्रश्न विचारले जातात. पण मनात काही वेगळचं असतं "कसलं फ़ालतू कापड आहे. असल्या टुकार साड्या मी नाही बाई नेसतं." ही मनातली वाक्य असतात.

अशा या फ़िरत्या करंडकाच्या नादात पैसा आणि भावना या दोन्ही गोष्टिंचा बाजार मांडला जातो. असा तुम्ही फ़िरवलेला करंडक परत तुमच्याकडे आला तर तुम्हाला परत मिळाला तर तुम्हाला कसं वाटेल? हा विचार करंडक फ़िरवण्याआधी नक्की करा...

Saturday 23 May 2009

हातचं सोडुन

मी पुण्यात शिकायला असताना माझी खोली झाडायला पुसायला एक आजी यायच्या. त्या मातंग समाजातील होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची १३-१४ वर्षाची नात सोनू असायची. ती पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिकायची. घरची परिस्थिती अतिशय गरीब असुनही ती अभ्यासात अतिशय हुशार होती.
एक दिवस तिची आजी कामाला आली नाही आणि त्यांनी सोनूला काम करायला पाठवलं. तेव्हा आमच्यात झालेला संवाद असा

मी: "काय ग, आज आजी नाही आली तुझी?"
सोनू: "नाही ताई, बर न्हाय तिला."
मी: "मग दवाखान्यात गेल्या होत्या का त्या?"
सोनू: "झोपली हाय घरी. उद्यापर्यंत पडेल आराम."
मी: "मग तु कशाला आलीस? परीक्षा आहे ना पुढच्या आठवड्यात?"
सोनू: "मग तुमचं काम कोन करणार?"
मी: "अभ्यास कर. कामाचं काय करायचं ते मी बघते. आजी काही रागवणार नाही तुला."
सोनू: "न्हाय ताई करु द्या काम मलाच. हातचं सोडून पळत्याच्या मागं कुठं जाऊ. हे काम जमलं न्हाय तर कोन इचारनार हाय मला. कितीबी शिकले तरी हे चुकणार न्हाय."

इतकं बोलुन ती कामाला लागली. मी काही मिनिटं स्तब्ध झाले. माझ्या मनात विचारांचं काहुर उठलं. "हातचं सोडुन पळत्याच्या मागे जाऊ नये" ही गोष्ट त्या १३-१४ वर्षाच्या मुलीला समजली होती पण आपण हा विचार कितीवेळा करतो. आपल्याला आयुष्यात काय हवं आहे? आपली सगळी धडपड चालू असते ती नेमकी कशासाठी?. आमची तरुण पिढी जी आज यशाची अनेक शिखरं गाठत आहे, ते आम्ही जगण्यातला खरा अर्थ विसरलो आहोत का? आज हा कोर्स उद्या अजुन नविन काहीतरी, असा करत एक दिशाहीन आयुष्य जगणारी अनेक लोक आपल्याला भेटतात. हातात असलेली सुख आपण सोडुन देतो. जवळच्या माणसांची काळजी करत नाही. केवळ हातात पैसा आहे म्हणुन एक भरकटलेलं आयुष्य जगणं चांगलं कि आहे त्यात समाधानी आणि आनंदी रहाणं चांगलं? हा विचार गरजेचा नाही का?.
हातचं सोडुन पळत्याच्या पाठी जाताना तेलही गेलं तुपही गेलं हाती राहीलं धुपाटणं अशी गत झाली तर चुक कोणाची? एका कविने लिहीलं आहे " साधं सोप आयुष्य साधं सोप जगावं, हसावस वाटलं तर हसावं रडावसं वाटलं तर रडावं". आयुष्यात हेच समजणं गरजेचं नाही का?